Chhatrapati Shivaji Maharaj Mavla : छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्यक्ष जगणारा, त्यांचे कार्य पुढे नेणारा मावळा कसा असावा याचे जिवंत उदाहरण म्हणजे परभणी येथील शंकरअण्णा देशमुख.
Genz पिढी म्हणजे केवळ नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थती निर्माण करू पाहणारे मुठभर आंदोलनजीवी नाहीत. ज्यांची मजल फक्त घोषणा देणे आणि डफली वाजवणे यांच्यापुरतीच आहे, असे अराजकी तत्व स्वतःस क्रांतिवीर समजून मिरवू लागतात तेव्हा त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की, या देशात असे अनेक क्रांतीवीर आहेत, जे प्रकाशझोतापासून दूर राहत, सांसारिक जबाबदारी पार पाडत, राजकीय व्यवस्था, प्रशासन, आप्तस्वकीय यांच्याशी संघर्ष करत शांतपणे देव,देश आणि धर्मासाठी समर्पित वृत्तीने कार्य करत आहेत. आझादी, राजीनामा या सारख्या घोषणा देऊन बातमी तयार होते, प्रश्नांवर उत्तर नाही. घोषणा द्यायचीच असेल तर ” छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय” अशी दिली पाहिजे. ज्यामधून प्रतिकूल परिस्थिती असतानाही आपले राष्ट्रकर्तव्य, धर्मकर्तव्य निष्ठेने पार पाडण्याची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. ही केवळ घोषणा नसून ती एक जबाबदारी समजून कार्य करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आजही निष्ठेने कार्य करत आहेत. यापैकीच एक म्हणजे परभणी येथील शिवप्रतिष्ठान चे आधारस्तंभ शंकरअण्णा देशमुख. माहितीचा विस्फोट झालेला असताना, समाजमाध्यमे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनत असताना छत्रपती शिवरायांचे विचार, त्यांचा मावळा कसा असतो हे Genz, Alpha या नव्या पिढ्यांना हे कळणे अतिशय आवश्यक आहे.
Shivpratisthan Hindustan : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संभाजी भिडे गुरुजी यांच्या कार्यापासून प्रभावित होऊन शंकरअण्णा देशमुख यांनी परभणीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे कार्य सुरु केले. यामध्ये प्रामुख्याने नवरात्रोत्सवमध्ये आयोजित होणारी दुर्गामाता दौड परभणीत सुरु झाली. २०२६ हे बारावे वर्ष आहे. यामध्ये ५०० ते ८०० धारकरी सहभागी असतात. परभणी शहरच नव्हे तर तालुकास्तरावर सुद्धा मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौड चे आयोजन केले जात आहे. तसेच गडकोट मोहिमेत परभणीचे धारकरी युवक सहभागी होत असतात. धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मरणार्थ बलिदान मास पाळणाऱ्या युवकांची संख्याही मोठी असते.
Anti-conversion law: धर्मांतर विरोधी कायदा मागणीची सुरुवात परभणीतून
हिंदू धर्मातील मुलीना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करायचे आणि फसवणूक करून उध्वस्त करण्याऱ्या घटना अनेक ठिकाणी घडल्या होत्या. हे सर्व नियोजनबद्ध पद्धतीने घडत होते. राज्यातील शेकडो हिंदू युवती या गैरप्रकाराला बळी पडल्या होत्या. अशा गुन्ह्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी एका सक्षम कायद्याची आवश्यकता होती. या मागणीसाठी संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच परभणीत मोठा मोर्चा काढण्यात आला. आणि त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चा काढून ही मागणी प्रखरतेने करण्यात आली. अखेर राज्य शासनाने विधिमंडळ अधिवेशनात धर्मांतर विरोधी कायदा संमत केला. विशेष म्हणजे जोपर्यंत हा कायदा अस्तित्वात येत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचे व्रत शंकरअण्णा यांनी स्वीकारले आणि ते निष्ठेने पाळले सुद्धा.
Also read : Anti CEC Protest : SIR तो बहाना है…
गोरक्षा, स्त्री रक्षा साठी नेहमीच तत्पर
गोवंश हत्या विरोधी कायदा मंजूर होऊनही अनेक ठिकाणी असे प्रयत्न होताना दिसून येतात. अशा वेळी ते गैरप्रकार कायदेशीररीत्या थांबवण्यासाठी अण्णा नेहमीच तत्पर असतात. तसेच लव्ह जिहाद सारख्या प्रकरणात पीडितेला कायदेशीर मदत मानसिक आधार देताना अण्णा मोठ्याभावासारखे उभे असतात. असे कित्येक प्रकरणे आहेत ज्यामध्ये मुलीना वाचवण्यात यश आले. त्यांचे आयुष्य उध्वस्त होण्यापासून वाचले. यासाठी किती पराकोटीचा संघर्ष असतो हे फक्त ते कार्य करणारेच जाणतात. वाचलेल्या मुलींच्या पालकांच्या डोळ्यातील कृतज्ञता हीच शंकरअण्णा यांची ताकद आहे.
राजकारणापासून अलिप्त
जिथे गर्दी असते त्या ठिकाणी राजकीय नेते आकर्षिले जातात आणि वेगवेगळ्या पद्धतीने गर्दीच्या म्होरक्याला आपलस करण्याचा प्रयत्न केला जातो. शंकरअण्णा तर परभणीतील शेकडो धारकऱ्यांचे सेनापती. त्यांच्याकडे राजकीय नेत्यांची नजर पडली नसती तर ते नवलच होते. परंतु अण्णा आजही राजकारणापासून चार हात लांब आहेत. केवळ देव, देश आणि धर्म हेच त्यांचे ध्येय आहे.
कौटुंबिक पाठबळ
देव, देश अन धर्मासाठी कार्य करणे हे येऱ्या गबाळ्याचे काम नाही. घरावर तुळशीपत्र ठेवणे म्हणजे काय असते ? याचा अनुभव येतो. पद, पैसा किंवा प्रतिष्ठा यापैकी कशाचीही अपेक्षा न करता नि:स्वार्थपणे काम करण्यासाठी कौटुंबिक पाठबळ अतिशय आवश्यक असते. किंबहुना तीच खरी ताकद असते. या कामात शत्रू वाढल्याने पदोपदी धोका असतो. कधीकाळी हिंदुत्वाचा बालेकिल्ला असणाऱ्या परभणीत दहशतवादी संघटनेचे स्लीपर सेल कार्यरत होते. ATS, NIA ने धाडसत्र करत यापैकी अनेक जन ताब्यातही घेतले होते.अशा परिस्थितीत कुटुंबाकडून काळजीपोटी काम थांबवण्याचा सुद्धा सल्ला दिला जातो. परंतु छत्रपती शिवराय, धर्मवीर संभाजी महाराज यांचे विचार, भिडे गुरुजी यांचे मार्गदर्शन असल्याने अण्णाचे कुटुंबीय त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
आदर्श मावळा
ज्या वयात इतर युवक प्रेमप्रकरणात गुंततात, व्यसनाधीन होतात त्याच वयात शंकरअण्णा नी शिवकार्याचा ध्वज हाती घेतला. संकटात मदतीसाठी धावणारा, राष्ट्रकार्यासाठी सदैव तत्पर असणारा हा मावळा येणाऱ्या पिढीला कळला पाहिजे, त्यांचे समर्पण, निस्वार्थ कार्य यापासून प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी यासाठी हा लेखनप्रपंच.



