Pandharpur Wari in Maharashtra : महाराष्ट्राची समृद्ध परंपरा असलेल्या पंढरपूरच्या वारी या विषयावर दै.लोकमत च्या संपादकीय पानावर प्रसिद्ध झालेला लेख.
दि. ०९ जुलै २०१४

महाराष्ट्र हा शब्द उच्चारला की, डोळ्यांसमोर गणेशोत्सव व पंढरपूरच्या वारीचे Pandharpur Wari चित्र उभे राहते. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे अभिन्न अंग आहे व त्याचे मुख्य सूत्र वारी हे आहे. सीगल या समुद्रपक्ष्याची कथा आपल्यापैकी बहुतेकांना ज्ञात असेल. हा समुद्रपक्षी केवळ अन्नाच्या शोधार्थ न भटकता उंच भरारी घेण्याची कला अत्यंत कष्टाने शिकतो व त्या अगम्य प्रदेशात विहार करतो, परंतु इतर समुद्रपक्ष्यांना ही कला यावी याकरता तो परत आपल्या मूळ ठिकाणी येतो व त्यांना ही कला शिकवू लागतो. अर्थातच, त्याला त्याला प्रवाहाच्या विरुद्ध जावे लागते; परंतु अत्यंत निष्ठेने तो हे काम करत राहतो. वारकरी संप्रदायात होऊन गेलेले संत हे खर्या अर्थाने सीगलच आहेत. ज्यांनी यातना सहन करून सामान्य जनांच्या जीवनात दिव्यत्व येण्यासाठी आयुष्य वेचले. या संतांनी वारकरी संप्रदायाची निर्मिती करून एका विलक्षण जगाची ओळख त्यांना करून दिली व प्रपंचात राहून आयुष्याचे र्मम समजून घेण्यासाठी जीवन जगण्याची कला शिकवली.





