नाशिकच्या फार्म हाऊसमधील न झालेल्या कार्यक्रमाचा वृत्तांत

 

नाशिकच्या अलिशान फार्म हाऊसवर आज सर्वत्र
धामधूम होती. सनई चौघड्याचे सूर निनादत होते. सर्वजण भुजात बळ आणून अगदी उत्साहात
तयारी करत होते.

आम्ही अवचित प्रगटलो आणि कानोसा घेतला तेव्हा
कळाले की
, साहेबांनी या वयात जाहीर केलं की, मला मुले झाली तर महापुरुषांची नावे ठेवीन.

त्यांच्या या घोषणेने नाशिकच्या आलिशान फार्म
हाऊसमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला होता.

घरी येताच साहेबांचे सर्वजण दणक्यात स्वागत
करणार होते. साहेबांना ओवाळण्यासाठी पाच महिलांना बोलावणे धाडले होते. तसेच सप्त
नद्यांचे पाणी व तसेच समुद्राच्या पाण्याने त्यांना आंघोळ घालण्यात येणार होती.

विशेष म्हणजे साहेबाना सरप्राईज देण्याचे ठरले
असल्याने या तयारीची कल्पना साहेबांना देण्यात आली नव्हती.

मुंबईत एज्युकेशन देणाऱ्या ट्रस्ट चे विशेष
आरोग्य पथक फार्महाऊसवार दाखल
झाले होते. साहेबांच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी
आरोग्यविषयक कुठलीही कमतरता भासू नये याची जबाबदारी पथकाला देण्यात आली होती.
राज्यातील साहित्यीकांची फौज नावे सुचवण्यास तत्पर होती.

समारंभाच्या निमंत्रितांची यादी आमच्या हाती
पडली.

१) तेल व घी चे व्यापारी दिवंगत अब्दुलभाई
करीमभाई यांचे परिवारातून एक सदस्य

२) ऑर्थर रोड वरील शासकीय सोयी असलेल्या ठिकाणी
साहेब आरामासाठी असताना त्यांच्यासोबत असलेले बॅचमेट.

३) महाराष्ट्राचे सदन व वेगवेगळी विकासकामे
करताना,  सहकार्य केलेले सर्व कंत्राटदार.

४) निस्वार्थपणे बदली केलेले अधिकारी, कर्मचारी.

५) मोठे साहेब अर्थात (काका) व छोटे साहेब
(पुतण्या) यांचे प्रत्येकी एक सदस्य.

६) छातीत कळ आल्याचे सांगताच तातडीने आराम
करण्याच्या सुचना देण्यात तज्ञ असलेले वैद्यकीय व्यावसायिक.  

अशी ही यादी बघितल्यावर आम्हास उत्सुकता होती ती
मेन्यूची. कारण एवढे मोठे लोक येणार असतील तर त्यांच्यासाठी विशेष सोय केलीच
असणार. परंतु तसे काही नव्हते. पुरणपोळी व तूप हे उच्चवर्णीयांचे खाद्य ठरवून
त्यावर निर्बंध घालण्यात आला होता. तसेच गायीला विशेष महत्व देत असल्याने सर्व
प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थावरही बंदी होती. सर्वानुमते केवळ पिठले व भाकरी हाच
मेन्यू होता.

अखेर बाहेर नाशिक ढोलची मोठी गर्जना झाली. साहेब
आल्याचे कळताच सर्वजन धावत मुख्य दरवाजाकडे निघाले. गाडीतून बाहेर येताच ओवाळणी
साठी महिला पुढे सरसावल्या. मात्र तेवढ्यात इपरीतच घडले.

छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्याकडे बघतात
तसे साहेब जमलेल्या लोकांकडे बघू लागले अन गळ्यातील मफलर काढून फेकून देत कुठेही न
थांबता आतमध्ये निघून गेले.

साहेबाना सरप्राईज आवडले नाही असे समजून सर्वच
जन हिरमुसले. रुसवा काढण्यासाठी कुटुंबीय लगबगीने साहेबांकडे गेले.त्यांच्यासोबत छातीत
कळ तज्ञ डॉक्टरही सरसावले.

साहेबांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. कुटुंबीयांनी
पाणी देऊन शांत होण्याची विंनती केली अन मोठा श्वास घेऊन साहेब थोडे शांत झाले. दोन
युवा नेते वगळता त्यांनी कुटुंबीयांना  बाहेर जाण्यास खुणावले. सर्वजन बाहेर गेले. डॉक्टरांचा
पवित्रा लक्षात घेऊन साहेबानी त्यांना दरडावले ‘तुम्हीपण’.

अरे काय आहे हा सर्व तमाशा ?   साहेब
रागात दोघांना बोलले.   

दोघा युवा नेत्यांनी समजावणीच्या रुपात सांगितले.
साहेब, आपणच घोषणा केलीत ना की, मुले झाली तर महापुरुषांची नावे ठेवीन म्हणून. त्यांचा
आनंदात हा सर्व तमाशा सोरी सोहळा.

कसले सोहळे करताय या वयात आता ? साहेबांनी
पुन्हा खडसावले.

दोघे युवा नेते एकमेकांकडे आश्चर्यचकित नजरेने
बघू लागले.

ते ओळखून साहेब बोलले, अरे बाबा ते बोलाव लागत.
भाषणच असत ते. प्रत्यक्षात नसत तस काही. आपण जे बोलतो ते कधीच करत नाही अन जे करायचं
असते ते बोलत नसतो. माझ्या अख्ख्या राजकीय जीवनातले एवढे साधे सूत्र तुम्हाला
लक्षात आले नाही तुमच्या.  सरस्वती बुद्धी
वाटत होती तेव्हा सुट्टीवर होता काय रे तुम्ही ?   

वातावरण एकदम गंभीर झाले. थोड्या वेळाने तिघे
बाहेर आले.   

तोपर्यंत सर्व पाहुणे उपाशीच मार्गस्थ झाले होते.
          

      


Related Posts

माझ्याविषयी

मी प्रसाद शिवाजीराव जोशी परभणी जिल्ह्यातील मानवत येथील रहिवासी आहे. मागील…

ऑगस्ट 6, 2026

भारत पुन्हा प्रजासत्ताक केव्हा होईल ?

वरील ऒळ वाचून कदाचित आपल्याल्या वाटॆल की. हा काय प्रश्न…

जानेवारी 24, 2011

Leave a Reply

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत