आपल्या देशात सण– उत्सवानंतर निवडणुकांमध्ये एक वेगळाच उत्साह बघायला मिळतो.वास्तविक हा उत्साह मतदारात हवा,परंतु तो केवळ राजकीय नेते व कार्यकर्त्यांमध्येच दिसून येतो.याच दरम्यान पक्ष निष्ठेची खरी परीक्षा होते.परीक्षा कसली सरळ सरळ वस्त्र हरणाच म्हणा ना. स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीत तत्कालीन राज्यकर्त्यांना देशाला एक प्रगल्भ लोकशाही देता आली असती. आदर्श लोकप्रतिनिधी कसे असावेत याचा एक वस्तुपाठ त्यांना निर्माण करता आला असता. आदर्श लोकप्रतिनिधीत्वाचे निश्कर्ष ठरवता आले असते. त्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत.त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज लोकप्रतिनिधी केवळ जात,पैसा हे बघूनच ठरवले जातात. त्यांच्या या पापाची फळे म्हणून आज देशात प्रभावी लोक्नेतृत्वाचा अभाव आहे. अपात्र लोक आल्यामुळे भ्रष्टाचार पराकोटीला पोहोचला आहे. वैयक्तिक चारित्र्य,नैतिकता, सामान्य जणांचे ,देशाचे प्रश्न ओळखून त्यावर उपाय योजना करणारे लोकनेते कुठे ? आणि प्रत्येक पाच वर्षांनी वैयक्तिक लाभासाठी निष्ठा विकायला काढणारे सौदेबाज कुठे ?
सत्ताकारणाचा सौदा झाला कि मग पूर्वी ज्या पक्षाची ध्येयधोरणे, तत्वे आदर्श चांगली होती तीच अचानक कालबाह्य, बुरसटलेली वाटायला लागतात.स्वाभिमान दुखावलेला जाणवतो,घुसमट होत असल्याची जान होते. यावेळी एक प्रश्न पडतो कि, हा गरीब बिच्चारा इतके दिवस भर वाळवंटात,कडक उन्हात, एका पायावर उभे राहून तपश्चर्या करता होता कि काय ? ज्या दिवशी कंत्राटदार आपला धंदा चालवण्यासाठी नेते झाले त्याच दिवशी लोकशाही पांगली झाली. आता तर विरोधी पक्षाच्या नेत्यांचे बिल अडवण्यापर्यंत मजल गेली आहे. मग तोही आपल्या व्यवसायासाठी पक्षांतर करतो. हेच आजचे किळस आणणारे भयाण राजकीय वास्तव आहे .
एक पक्की वैचारिक बैठक असणाऱ्या, तत्वांसाठी, मूल्यांसाठी झगडणाऱ्या नेत्याची आज देशाला गरज आहे. दुरदर्शित्व असणारे नेते तयार तरी कशे होणार.आजचा युवक बेरोजागारीशी प्रचंड झुंज देत आहे. बऱ्याच वेळेस अपयशाने त्याला नैराश्य आले आहे. अशा परिस्थितीत नवे नेते कसे तयार होणार. इथे दररोज एका नेत्याचा भ्रष्टाचार उघडकीस येतो. त्याने आदर्श ठेवायचा तरी कोणाचा?
पण म्हणून गप्प बसून कसे चालेल ? हि परिस्थिती बदलायची असेल तर समाजातील सज्जनांना संघटीत व्हावे लागेल. आज दुर्जन सुसंघटीत तर सज्जन विखुरलेले आहेत. प्रथम आपण १०० % मतदान होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मतदान करताना जात,पैसा इ. प्रलोभनांचा विचार करता कामा नये.सगळे वाईटच आहेत असे नाही. आपण स्वस्थ बसलो तर अपात्र लोक निवडून येतात आणि पुढील पाच वर्षे तो फक्त कमावत राहतो.
यासाठी आपण स्वत: जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत.विकासाची जाण असणाऱ्या उमेदवारास मत द्यावे. आपणास हे जर करता आले नाही तर देशातील भ्रष्ट नेत्यांना नवे ठेवण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही. आता जर आपण कर्तव्यशुन्य राहिलो तर येणारी पिढी आपणास कधीच माफ करणार नाही.आपल्या कडून घडणारा हा पितृदोष कुठल्याही विधीने नष्ट होणार नाही.आताच आपण लोकपाल चे यशस्वी आंदोलन केले , अशाच पद्धतीने राईट टु रिजेक्ट हि येऊ शकतो. आता फक्त गरज आहे ती आपण आपला राष्ट्रधर्माचे पालन करून भारतमातेला परमवैभवाकडे नेण्याची.



