Online Education : ऑनलाईन शिक्षणाची इष्टापत्ती
Online Education: अस म्हणतात की काळ कोणासाठी थांबत नाही, परंतु या पिढीने काल थांबलेला पाहिला. कधी कोणी कल्पनाही केली नसेल एवढी हादरवून टाकणारी स्तब्धता, भयाण काळरात्रीची शांतता मागील वर्षभरात अनुभवली. कोरोना या शब्दाने प्रचंड दहशत निर्माण केली. जी अजूनही पूर्णत: संपली नाही. या कालावधीत अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ झाली. आर्थिक घडी विस्कटली. शैक्षणिक वर्षाची परवड झाली. जिथे जीवनमरणाचाच प्रश्न असतो तिथे इतर बाबी दुय्यम ठरतात. परंतु या वादळातही जगण्याच्या विजीगिषु वृत्तीने आपले मार्ग शोधले. घरात राहूनच व्यापार, शिक्षण व नौकरी करण्याचे मार्ग सापडले. टाळेबंदी काळात व नंतरही ऑनलाइन हा जीवनव्यवहारातील महत्वाचा शब्द बनला. विशेषत: शिक्षणाच्या बाबतीत तर सर्व काही भार ऑनलाइन माध्यमावरच होता. मात्र वर्षभरानंतरच्या कालावधी नंतर ऑनलाईन पर्यायाच्या बाबतीत सविस्तर विचार होणे आवश्यक आहे. याचे कारण असे की, ऑनलाईन शिक्षणाच्या जश्या जमेच्या बाजू आहेत तश्या कमतरताही प्रकर्षाने दिसून येत आहेत.